निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी पठाण सिनेमातलं बेशरम रंग हे पहिलं गाणं सोमवारी प्रदर्शित केल्या क्षणापासूनच इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून जगभरात ट्रेंडिंग होत असून चाहते आणि प्रेक्षक या गाण्यातल्या शाहरूख व दीपिकाच्या लूकचं भरभरून कौतुक करत आहेत. लूकबरोबरच कोरिओग्राफीचीही चर्चा असून बेशरम रंगमध्ये दीपिका सर्वात हॉट दिसली आहे यावर सर्वांचं एकमत झालं आहे.
प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंट बॉलिवूड हिरॉइन्सना हॉट लूकमध्ये सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बंटी और बबलीच्या कजरा रे मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, धूम 3 च्या कमलीमध्ये कतरिना कैफ आणि आता बेशरम रंग मध्ये दीपिका पदुकोण यांची वेगळीच झलक दाखवणाऱ्या वैभवी या गाण्याला मिळत असलेल्या प्रतिसादाने भारावून गेल्या आहेत.
त्या म्हणाल्या, ‘आतापर्यंतच्या कामात मी जाणीवपूर्वक नायिकांना कलात्मक पद्धतीने सादर करण्यावर भर दिला आहे. उदा. कजरा रे मध्ये ऐश्वर्या राय बच्चनला तिच्या अदाकारीतल्या हावभावांवर भर द्यायला सांगितलं, तर कमलीमध्ये कतरिनाला कशाप्रकारचं नृत्य करताना जास्त छान दिसेल ते पाहिलं.’
त्या पुढे म्हणाल्या, “कोरिओग्राफी करताना त्या-त्या कलाकाराचा अभ्यास केला गेला पाहिजे असं माझं ठाम मत आहे, कारण एखादं नृत्य मी किंवा माझ्या असिस्टंटवर जितकं छान दिसेल, तितकं ते त्या कलाकारावर दिसेलच असं नाही. ते नृत्य त्या कलाकाराची अभिव्यक्ती दिसायला हवं.“
वैभवी पुढे म्हणाल्या, “गंमत म्हणजे, बेशरम रंग करण्यापूर्वी मी कधीच दीपिकासोबत काम केलेलं नव्हतं. हे आम्ही करत असलेलं पहिलंच गाणं आहे आणि तिच्यासाठी काहीतरी खास करावं लागणार याची मला कल्पना होती. तिचं मला संपर्क करणं आणि अखेर आम्ही एकमेकींसोबत काम करणं शक्य झालं. मी दीपिकालाही म्हणाले, की हे आपलं पहिलंच गाणं आहे आणि ते मला खूप खास पद्धतीनं करायचं आहे. आपलं हे गाणं विलक्षण व्हायला हवं अशी माझी इच्छा आहे.”
वैभवी म्हणाल्या, की त्यांनी दीपिकाला आतापर्यंत भारतातली सर्वात हॉट हिरॉइन बनवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. त्या म्हणाल्या, ‘आतापर्यंत ती कधीही न दिसलेल्या रूपात मला तिला दाखवायचं होतं. अर्थात कॉश्च्युम्सचं श्रेय मी शालीना नाथानीला देईन. दीपिकासोबत माझी छान गट्टी जमली आणि तिचा आत्मविश्वास पाहून तर मी थक्क झाले. ती या गाण्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये अद्भुत दिसली आहे.’
वैभवी पुढे म्हणाल्या, ‘बेशरम रंग गाण्याच्या लूकसाठी दीपिकानं प्रचंड मेहनत केली. आहारतज्ज्ञ, प्रशिक्षक आणि शालीनाने दिलेले कॉश्च्युम्स अशी तिची सगळी टीम मेहनत घेत होती. या गाण्याचे सगळे कॉश्च्युम्स कॅरी करण्याचा तिचा दृष्टीकोन आणि स्टाइल दोन्ही असामान्य होते. मला वाटतं, त्याचमुळे हे गाणं विशिष्ट प्रकारे चित्रित केलं गेलं. नाहीतर एरवी ते कॉश्च्युम्स घालून आम्ही ज्या प्रकारे गाणं शूट करतो तसं करायला मला तिला सांगताच आलं नसतं. हे सगळं तिच्या कूल स्वभावामुळे शक्य झालं.’
पठाण सिनेमातल्या या गाण्यात आकर्षक दीपिका शाहरूख खानसारख्या खतरनाक, बंदूक रोखताना मागेपुढे न पाहाणाऱ्या स्पायबरोबर दिसते. दोघंही या गाण्यात अतिशय हॉट आणि फिट दिसत असून दीपिका बिकिनीमध्ये, तर शाहरूख खान त्यांच्या परफेक्ट एट पॅक् अॅब्जमध्ये पाहायला मिळतील. बेशरम रंगचं शूटिंग स्पेनमधलं समुद्रकिनारचं सगळ्यात प्रेक्षणीय ठिकाण मालोर्का, कॅडिझ आणि जेरेझ इथं करण्यात आलं आहे.
दीपिका आणि एसआरके ही भारतीय सिनेमांच्या इतिहासातील सगळ्यात प्रसिद्ध जोडी असून त्यांनी आतापर्यंत ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयर हे सिनेमे केले आहेत.
पठाण हा भारतातला सर्वात मोठा अॅक्शन सिनेमा आहे. यश राज फिल्म्सचा हा नेत्रसुखद सिनेमा आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असून त्यामध्ये शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे देशातले सर्वात मोठे सुपरस्टार्स काम करत आहेत. हा थरारक सिनेमा 25 जानेवारी, 2023 रोजी हिंदी, तमिळ व तेलुगुमध्ये प्रदर्शित होणार आहे.