नवी मुंबई, २४ एप्रिल २०२४: अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबईतील (एसीसीएनएम) डॉक्टरांनी सिकलसेल रोगावर मात करण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) ची क्षमता दर्शविणारी गुंतागुंतीची यशस्वी प्रक्रिया करून १४ महिन्यांच्या मुलीवर यशस्वी उपचार केले आहे. केनियामधील रहिवासी असलेल्या या लहान मुलीला सिकलसेल रोग असल्याचे निदान झाले. सिकलसेल ही एक अनुवांशिक स्थिती आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशी असामान्यपणे आकार घेतात, त्यामुळे शरीराच्या ऊतींना ऑक्सिजन पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. दीर्घकाळ उद्भवणाऱ्या या आजारामुळे गंभीर परिणाम दिसून येतात, ज्यासाठी ब्लड ट्रान्सफ्युजनची आवश्यकता असते. तसेच वारंवार तीव्र वेदना, वारंवार संक्रमण, स्ट्रोक आणि काहीवेळा अवयवांचे नुकसान यासारख्या गुंतागुंती होतात.
रुग्णाला सिकलसेल रोग झाल्यामुळे तिला वारंवार वेदना होत होत्या, ज्यास व्हॅस्को-ओक्ल्युसिव्ह क्राइसिस म्हणतात आणि तिला वारंवार ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडत होती. तिच्या या आजारामुळे तिचे जीवन असह्य झाले होते, आणि कुटुंबावर आर्थिक भार वाढत होता. अखेर ते आशेच्या शोधात अपोलो कॅन्सर सेंटर (एसीसी) कडे आले. सखोल मूल्यमापन केल्यानंतर, अपोलो येथील बाल-हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट व सल्लागार डॉ. विपिन खंडेलवाल यांनी असा निर्णय घेतला की मुलीवर बीएमटी केले पाहिजे. मग त्यानंतर दात्याचा शोध सुरू झाला. सुदैवाने, तिचा ११ वर्षांचा भाऊ परिपूर्ण एचएलए जुळणारा ठरला.
डॉ.विपिन खंडेलवाल, सल्लागार-बाल-हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, अपोलो कॅन्सर सेंटर यांनी स्पष्ट केले की,”इतर उपचार प्रामुख्याने लक्षणांवर काम करतात तर बीएमटी सिकलसेल रोगासाठी संभाव्य उपचार प्रदान करते. स्वतःचा भाऊ जुळलेला दाता असल्यामुळे, रोगमुक्त होऊन जगण्याचा दर ९०% पेक्षा जास्त होतो आणि रुग्णांमध्ये होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांमध्ये नाट्यमयरित्या सुधारणा घडून येते.” मुलीच्या कुटुंबीयांनी पाठपुराव्यासाठी भेट घेतली, तेव्हा आम्ही केलेल्या रक्त चाचण्यांमध्ये दात्याची पेशी संलग्न होण्याची १००% पुष्टी झाली. याचा अर्थ असा की प्रत्यारोपित स्टेम पेशी सामान्यपणे कार्य करत आहेत आणि निरोगी लाल रक्तपेशी तयार करत आहेत. यामुळे दोन गोष्टी घडल्या, बीएमटीच्या यशाची पुष्टी झाली आणि लहान मुलीला रोगमुक्त होण्याच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा गाठता आला.
श्री.संतोष मराठे, प्रादेशिक सीईओ-पश्चिमी विभाग, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाले,“लहान मुलांच्या हेमॅटोलॉजी आणि ऑन्कोलॉजी मधील कौशल्यासाठी अपोलो कॅन्सर सेंटरचा जगभरात आदर का केला जातो, याचा पुरावा या प्रकरणामुळे मिळाला आहे. सिकलसेल रोगासारख्या आव्हानात्मक समस्या असलेल्या रुग्णांना आशेचा किरण आणि प्रगत उपचार प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एसीसी कडे अनुभवी आणि बीएमटी प्रशिक्षित नर्सिंग कर्मचारी असलेले बालरोग सब-स्पेशालिटी सल्लागार आहेत.”