मुंबई, ६ सप्टेंबर २०२३: सहावे ग्लोबल एक्झिबिशन ऑन सर्व्हिसेस लवकरच आयोजित केले जाणार आहे. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागांतर्गत सर्व्हिसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे आयोजित केले जाणारे ग्लोबल एक्झिबिशन ऑफ सर्व्हिसेस २०२३ ग्रेटर नोएडा येथे इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्टमध्ये १४ ते १६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
भारतात सध्या सुरु असलेल्या जी२० प्रेसिडेन्सी कार्यक्रमांना अनुसरून, जीईएस २०२३ ची संकल्पना ‘इंडिया सर्व्ह्स’ अशी ठरवण्यात आली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, धोरणकर्ते, भारतीय व जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीईओ, विचारवंत, उद्योगविश्वातील दिग्गज, इनोव्हेटर्स आणि जागतिक सेवा उद्योगक्षेत्रातील शेकडो आंतरराष्ट्रीय खरेदीदार यामध्ये सहभागी होतील.
भारताच्या विविध भागांतील, कानाकोपऱ्यातील सेवाक्षेत्रातील हितधारकांना एकाच छताखाली एकत्र आणून सेवाक्षेत्रातील आपल्या देशाचा प्रभाव दर्शवणे हा या प्रतिष्ठित प्रदर्शनाचा उद्देश आहे. याखेरीज जीईएस २०२३ मध्ये ५०० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होतील. ८०० पेक्षा जास्त विदेशी व्यवसाय पाहुण्यांना याठिकाणी आमंत्रित केले जाईल. भारतातून प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापाराला चालना देण्याची व एकमेकांशी समन्वय प्रस्थापित करण्याची अतुलनीय संधी जागतिक उद्योगक्षेत्राला याठिकाणी प्राप्त होणार आहे.
भारतातील वैद्यकीय मूल्य पर्यटनावर लक्ष केंद्रित करणारा ‘अतिथी’ हा उपक्रम देखील जीईएस २०२३ मध्ये पाहता येईल. या विशेष विभागाला २५० पेक्षा जास्त व्यावसायिक, १०० पेक्षा जास्त भारतीय वैद्यकीय पर्यटन कंपन्या भेट देतील, आंतरराष्ट्रीय व्याख्यात्यांची २०० पेक्षा जास्त ज्ञान सत्रे आयोजित केली जातील. वैद्यकीय पर्यटनाचे अतुलनीय डेस्टिनेशन हे भारताचे अनोखे स्थान अधोरेखित करण्यावर ‘अतिथी’ मध्ये भर देण्यात येईल.
सर्व्हिसेस एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे डायरेक्टर जनरल श्री. अभय सिन्हा यांनी सांगितले, “भारतीय सेवा क्षेत्रासाठी आयोजित करण्यात येणारे ग्लोबल एक्झिबिशन हा भारताला स्वतःच्या क्षमता प्रदर्शित करण्यासाठी आणि जागतिक भागीदारींमध्ये सहभागी होण्यासाठी उपलब्ध करवून दिला जाणारा मंच आहे. भारताचा आर्थिक प्रभाव आणि याठिकाणी वेगाने विकसित व वृद्धिंगत होत असलेला सेवा विभाग यांचे हे द्योतक आहे. आयटी, आरोग्य देखभाल, वित्त, हॉस्पिटॅलिटी आणि इतर अनेक क्षेत्रांमधील विविध सेवा कंपन्या याठिकाणी येतील. आपल्या सेवा क्षेत्राच्या लक्षणीय क्षमता दर्शवण्याबरोबरीनेच आंतरराष्ट्रीय सहयोग व समन्वयाला चालना देण्याप्रती आमची बांधिलकी यामधून दिसून येते.”