मुंबई, डिसेंबर 18, 2023 – मुंबई सेंट्रलस्थित सुप्रसिद्ध वोक्हार्ट रुग्णालयाने रुग्णसेवेचा वसा घेतला असून रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. रुग्णांच्या आहारामध्ये भरड धान्यांपासून तयार केलेले पदार्थ समाविष्ट करण्यात आले आहेत. सोडेक्सोच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘आरोग्यम’ असं या उपक्रमाचे नाव असून रुग्णांना दिला जाणारा आहार सकस, पौष्टीक आणि रुचकर असावा हा यामागचा उद्देश आहे.
रुग्णांच्या आहाराप्रती वोक्हार्ट रुग्णालय हे सातत्याने जागरूक राहिले असून ही जागरुकता दाखवण्यासाठी रुग्णालयाने भरडधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांचा एक फूड शो आयोजित केला होता. भरड धान्ये ही रुग्ण बरे होण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावतात हे यातून दाखवण्यात आले. या फूड शोमध्ये सोडेक्सोच्या शेफने भरडधान्यांपासून विविध रुचकर पदार्थ तयार करून दाखवले. या पदार्थांचे पोषणमूल्य किती आहे हे या फूड शोमध्ये सहभागी झालेल्या आहारतज्ज्ञांनी समजावून सांगितले. फूड शोमध्ये तयार करण्यात आलेले पदार्थ जितके स्वादिष्ट होते तितकेच ते पोषकही होते. रुग्ण लवकर बरे होऊन त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून निघण्यासाठी, ते तंदुरुस्त होण्यासाठी भरडधान्यांपासून बनविलेल्या पदार्थांची मदत होणार आहे.
“चांगल्या आरोग्याची सुरुवात ही चांगल्या आहारापासून होते असं वोक्हार्ट रुग्णालयातील आम्ही सगळेजण मानतो. आमच्या रुग्णांसाठी भरडधान्यापासून तयार केलेले पदार्थ आहारात समाविष्ट करणारे आम्ही मुंबईतील पहिले रुग्णालय आहोत, याचा आम्हाला आनंदही आहे आणि समाधानही आहे. भरडधान्ये ही अत्यंत पोषक असतात. त्यामध्ये जीवनसत्वे, खनिजे यांचे प्रमाण बरेच असते. त्यामुळे ही भरडधान्ये पोषणाचे भांडार आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. रुग्णांवर आम्ही केवळ उपचार करत नाही तर त्यांची सर्वांगीण काळजी घेत असतो. भरडधान्य पदार्थांचा रुग्णांच्या आहारातील समावेश हा त्याचसाठी घेतलेला निर्णय आहे. ‘आरोग्यम’ हा उपक्रम रुग्णांच्या भल्यासाठी घेण्यात आलेला महत्त्वाचा निर्णय आहे.” असे वोक्हार्ट रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका जहाबिया खोराकीवाला यांनी सांगितले.
“रुग्णांना दिले जात असलेले अन्न आणि पोषक तत्वे यामध्ये काहीतरी त्रुटी राहात होती. आम्ही रुग्णालयांसोबत काम करून ही त्रुटी ओळखून ती दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. रुग्ण बरा होण्यासाठी अन्न पदार्थांनीही महत्त्वाची भूमिका बजावणे गरजेचे असते आणि त्यासाठी हे पदार्थ सकस आणि पोषक असणे गरजेचे असते. रुग्णाला आवश्यक असलेल्या पोषणाची गरज लक्षात घेऊन आम्ही आरोग्यम हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. आयुर्वेदापासून प्रेरणा घेऊन आम्ही हा उपक्रम राबविला आहे. ताज्या, नैसर्गिक घटकांचा वापर करण्यासोबतच आम्ही आहारतज्ज्ञ आणि खाद्यपदार्थ बनविणाऱ्यांची मते ध्यानात घेऊन आम्ही विशेष पदार्थ तयार केले. हे पदार्थ स्वादीष्ट आहेतच शिवाय पौष्टीकही आहेत.” असे सोडेक्सो चे आरोग्य आणि सेवा विभागाचे संचालक शरद मिश्रा यांनी सांगितले.
‘आरोग्यम’ या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेले भरडधान्य पदार्थ निवडण्याचा पर्याय रुग्णांना मिळाला आहे. पारंपरीक आहाराला या उपक्रमामुळे पर्याय निर्माण झाला असून यामुळे रुग्णालयातील आहारामध्येही वैविध्यता आली आहे. अन्न हे पौष्टीक असावे शिवाय ते रुचकरही असावे यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
वोक्हार्ट रुग्णालयाने सातत्याने रुग्णकेंद्रीत दृष्टीकोन अवलंबला असून हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हा त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमाने मुंबईतील आरोग्य क्षेत्रात एक नवा मापदंड प्रस्थापित झाला आहे. ‘आरोग्यम’ उपक्रम वोक्हार्ट रुग्णालयाने अंगीकारलेले नवकल्पना, कल्याण आणि रुग्णांना प्राधान्य देण्याचे धोरण अधिक बळकट करण्यास मदत करणारा आहे. या उपक्रमामुळे आरोग्यसेवा क्षेत्र आणि पौष्टीक उत्कृष्टता याची नवी क्षितिजे खुली झाली आहेत.