चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूख खान पठाण सिनेमातून मोठ्या पडद्यावर परत येत आहेत. त्यांनी सांगितलं, की या सिनेमामुळे त्यांचं तब्बल 32 वर्ष जुनं स्वप्न साकार होत आहे. शाहरूख यांना कायमच मोठ्या पडद्यावर थरारक अॅक्शन हिरो साकारायचा होता!
निर्माते यश राज फिल्म्सने प्रसारित केलेल्या व्हिडिओ मध्ये एसआरके म्हणतात, मी 32 वर्षांपूर्वी या इंडस्ट्रीत अॅक्शन हिरो बनण्यासाठी आलो होतो, पण तसं काही झालं नाही कारण त्यांनी मला रोमँटिक हिरो बनवलं. मला तर फक्त अॅक्शन हिरो बनायचं होतं. म्हणजे, मला डीडीएलजे आवडतो, शिवाय राहुल- राज आणि बाकीचे मी साकारलेले प्रेमळ हिरो आवडतात,
पण तरीही अॅक्शन हिरो बनायची इच्छा काही डोक्यातून गेलेली नव्हती. त्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी एकप्रकारची स्वप्नपूर्ती आहे.
पठाण सिनेमातील आपल्या व्यक्तीरेखेविषयी शाहरूख खान म्हणाले, ‘पठाण हा तसा साधा पण अवघड गोष्टी करणारा माणूस आहे. मला वाटतं, तो खट्याळ आहे आणि खंबीर पण आहे, फक्त तसं दाखवत बसत नाही. तो विश्वासू आहे, प्रामाणिक आहे आणि भारताला आपली आई मानणारा आहे.
पठाण सिनेमात एसआरके देखण्या दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहेत. शाहरूख आणि दीपिका ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात गाजलेल्या जोड्यांपैकी एक असून त्यांनी आतापर्यंत ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयर असे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत.
पठाण सिनेमातल्या दीपिकाच्या भूमिकेविषयी शाहरूख म्हणाले, ‘बेशरम रंगसारखं गाणं साकारण्यासाठी दीपिकासारख्या उच्च पातळीच्या कलाकाराची गरज असते. शिवाय, तिनं यात अॅक्शनसुद्धा केली आहे. ती एका माणसाला तिच्यावरून ओढून बाजूला घेत बडवून काढते. हे करण्याइतपत ती धीटसुद्धा आहे. हे समीकरण फक्त दीपिकासारख्याच अभिनेत्रीमध्ये दिसते. अॅक्शन सिनेमाची हिरॉइन असूनही तिच्या भूमिकेला बरेच पैलू आहेत.’
पठाणविषयी एसआरके यांनी व्यक्त केलेल्या भावना इथे पाहा – https://www.youtube.com/watch?v=v1JI1b3RIcI
पठाण हा सिनेमा आदित्य चोप्रा यांच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग असून त्यात शाहरूख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्यासारखे देशातील सर्वात मोठे सुपरस्टार्स काम करत आहेत. वायआरएफचा हा थरारक सिनेमा पठाण 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ व तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.
पठाणबद्दल असलेली चर्चा आता कळसाला पोहोचलेली आहे. वायआरएफने प्रदर्शित केलेल्या टीझरपासून बेशरम रंग आणि झूमे जो पठाण या दोन गाण्यांपर्यंत सिनेमाच्या प्रत्येक गोष्टीला आतापर्यंत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ट्रेलरने इंटरनेटवर धमाल उडवून दिली आहे.