मुंबई, २३ मे २०२४: भारतातील आघाडीचा अर्ली-स्टेज अॅक्सलरेटर फंड ९युनिकॉर्न्सने मोठ्या रिब्रॅण्डिंग उपक्रमानंतर दुसऱ्या फंडाची घोषणा केली आहे. या रिब्रॅण्डिंग उपक्रमाची परिणती म्हणूनच ९युनिकॉर्न्स आता १००युनिकॉर्न्स म्हणून ओळखली जाणार आहे.
१००युनिकॉर्न्स हा भारतातील सर्वांत मोठ्या विविध टप्प्यांतील गुंतवणूक फर्म व्हेंचर कॅटालिस्ट्स ग्रुपचा भाग आहे. या कंपनीने आपला १०० युनिकॉर्न्स फंड २ हा २०० दशलक्ष डॉलर्स लक्ष्य आकारमानासह बाजारात आणला आहे. यामध्ये १०० दशलक्ष डॉलर्सचा ग्रीन-शू पर्याय आहे. हा फंड बाजारात आणून कंपनीने भारतात उदयाला येऊ पाहणाऱ्या २०० चॅलेंजर स्टार्टअप्सच्या नवीन लाटेच्या वाढीची जोपासना करण्याप्रती ठोस बांधिलकी दाखवून दिली आहे.
या धोरणात्मक पावलातून १००युनिकॉर्न्सचे नवोन्मेष्कारी कंपन्यांना चालना देण्याचे उद्दिष्ट दिसून येते. त्याचप्रमाणे भारतातील स्टार्टअप परिसंस्थेतील स्थित्यंतराची ही सुरुवात आहे. आंतरराष्ट्रीय निधी स्रोतांवरील अवलंबित्व यामुळे कमी होणार आहे. भारतीय स्टार्टअप्स आणि उद्योजकांना आता त्यांच्या स्वत:च्या परिसंस्थेतूनच त्वरित भांडवल उपलब्ध होऊ शकेल आणि यामुळे देशातील उद्योजकतेला चालना मिळेल.
व्हेंचर कॅटालिस्ट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि १००युनिकॉर्न्सचे सहसंस्थापक डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले “१००युनिकॉर्न्स म्हणून रिब्रॅण्डिंग करणे ही आमच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील पुढील पायरी आहे. आम्ही भारतातील स्टार्टअप परिसंस्थेत लक्षणीय वाढ होताना बघत आहोत आणि गेल्या दोनेक वर्षांत निधींचा प्रचंड ओघ या क्षेत्रात आला आहे. गेल्या ३-४ दशकांपासून भारताला आयटी आउटसोर्सिंग राष्ट्र समजले जात होते पण गेल्या १० वर्षांत भारत अब्जावधी डॉलर्सच्या कंपन्यांमधील जागतिक नेता म्हणून उदयाला आला आहे. पुढील १० वर्षांत भारत ‘स्टार्टअप राष्ट्र’ म्हणून उदयाला येईल, असे मला ठामपणे वाटते. या स्टार्टअप्सद्वारे जास्तीत-जास्त उद्योजक, सर्वाधिक युनिकॉर्न्स आणि सर्वाधिक रोजगारनिर्मिती होईल. आज भारतीय लोक अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने व क्लीनटेक यांसारख्या उगवत्या क्षेत्रांमध्ये पूर्वी अशक्यप्राय वाटत होत्या अशा कल्पना प्रत्यक्षात आणत आहेत. या विकासाच्या पायावर २०० डॉलर्स फंडाचे नवीन पाऊल टाकताना आम्ही खूपच उत्साहित आहोत. भारतातील स्टार्टअप परिसंस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे आवश्यक आहे.”
१००युनिकॉर्न्सचे भागीदार राजेश माने म्हणाले, “१००युनिकॉर्न्सने सर्वोत्तम संस्थापकांना ओळखत त्यांना करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य पाठिंबा देत सक्षम करण्याचे आपले मॉडेल सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही विकास व फंड उभारणीवर लक्ष केंद्रित करत स्टार्टअप्सना संस्थात्मक पाठिंबा दिला आहे.”