कल्पना करा, एखाद्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे उठला आहात आणि तुमच्याभोवतीचं जग अनियंत्रितपणे गरगरा फिरत आहे. काहीजणांसाठी ही जाणीव एखाद्या निसटत्या क्षणापुरती राहत नाही – तर त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनून गेलेली असते. व्हर्टिगो ही एक अशी स्थिती आहे, जी शरीराच्या तोल साधण्याच्या जाणीवेवर परिणाम करते. ही स्थिती कुणालाही गाठू शकते, तरीही तिच्याविषयीच्या जागरुकतेचे प्रमाण मात्र अजूनही मर्यादित आहे.
जागतिक स्तरावर प्रत्येक दर १० पैकी एका व्यक्तीला आयुष्याच्या कोणत्या-ना-कोणत्या टप्प्यावर व्हर्टिगोचा त्रास होतो, आणि भारतातील जवळ-जवळ ७ कोटी लोकांना हा आजार आहे. भारतातील कित्येक जण तर वर्षभराहून अधिक काळ या व्हर्टिगोबरोबर जगत असल्याचे व महिन्यातून एक-दोनदा त्याचा झटका अनुभवत असल्याचे अबॉटने आयक्यूव्हीआयएच्या सहयोगाने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. हा त्रास वारंवार जाणवत असूनही अनेक व्यक्ती आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा अगदीच नाइलाज झाल्याखेरीज वैद्यकीय मदत घ्यायला टाळाटाळ करत राहतात.
अबॉट इंडियाच्या मेडिकल डिरेक्टर डॉ. जेजु करनकुमार सांगतात, “व्हर्टिगोविषयी जागरुकता निर्माण करणे ही लोकांना आवश्यक ते सहाय्य मिळविण्यासाठी लागणाऱ्या माहिती व संसाधनांनिशी त्यांची मदत करण्याची गुरुकिल्ली आहे. अबॉट आणि आयक्यूव्हीआयएच्या सर्वेक्षणानुसार व्हर्टिगोच्या रुग्णांना गरगरण्याच्या भावनेच्या जोडीला जाणवणाऱ्या इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी (५४ टक्के),, डोके जड होणे (४१ टक्के), आणि मान दुखणे (२८ टक्के) या गोष्टींचा समावेश असतो. यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अडथळे येतात, ज्यामुळे त्यांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाणे रद्द करावे लागते, त्यांना गैरहजर रहावे लागते तसेच कुटुंबाबरोबरही नेहमीपेक्षा कमी वेळ घालवता येतो. लवकर निदान करून घेण्यास प्रोत्साहन दिल्याने आणि योग्य उपचारांचा आधार मिळाल्याने व्हर्टिगोचा प्रभाव कमी करण्यास मदत होऊ शकते आणि रुग्णांना एक संतुलित व आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येते.”
व्हर्टिगोमुळे येणारी चक्कर नीट समजून घ्या
गरगरणे म्हणजे काही क्षणांसाठी डोके हलके झाल्यासारखे वाटणे, अस्थिर वाटणे, तोल जातोय असे वाटणे, अशक्त किंवा अगदी घेरी येतेय असे वाटणे. पण व्हर्टिगो असलेल्या व्यक्तीला या सर्व लक्षणांच्या जोडीने आपला भोवताल फिरत असल्यासारखे व त्यामुळे आपला तोल जात असल्यासारखे वाटते. अनेक जण ही रक्तातली साखर वाढल्याची, ब्लड प्रेशर कमी झाल्याची, डिहायड्रेशनची किंवा ताणतणावाची लक्षणे असल्याचे गृहित धरून व्हर्टिगोकडे दुर्लक्ष करतात. व्हर्टिगो असलेल्या व्यक्तींपैकी ४४ टक्के व्यक्तींना आठवड्यातून किमान एकदा तरी हा गरगरण्याचा अनुभव येतो असे अबॉट आणि आयक्यूव्हीआयएच्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे. व्हर्टिगोमध्ये अशी चक्कर येण्याची किंवा गरगरण्याची तीव्रता कमी-जास्त असू शकते, पण त्याला झटकून न टाकणे महत्त्वाचे. या समस्येची लवकरात लवकर तपासणी झाल्यास लवकरात लवकर निदान होते व उपचार सुरू होतात, ज्यामुळे भविष्यातील गुंतागूंती टाळता येतात.
सायन हॉस्पिटल, मुंबईच्या एचओडी व कन्सल्टन्ट ईएनटी अँड स्कल बेस सर्जन डॉ. रेणुका ब्राडू यांच्या मते, “व्हर्टिगो हा आजार भारतात अधिकाधिक सार्वत्रिक होत आहे, मात्र अनेक व्यक्तींना त्याची लक्षणे ओळखू येत नाहीत, ज्यामुळे निदान व उपचारांना विलंब होऊ शकतो. अनेक व्यक्ती व्हर्टिगो, चक्कर आल्याची भावना व अस्थिर वाटणे व उलटीच्या भावनेसारख्या लक्षणांना कसे ओळखावे याबद्दल अनभिज्ञ असतात. डोके गरगरल्याने येणारी चक्कर आणि व्हर्टिगोमुळे येणारी चक्कर यातील फरक ओळखण्याविषयी जागरुकता निर्माण झाल्यास योग्य निदान व उपचार मिळण्यास मदत होऊ शकेल.”
व्हर्टिगोचे प्रभावी व्यवस्थापन
व्हर्टिगोचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी व जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी काही साधेसोपे उपाय
• लवकरात लवकर निदान करून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या: तुम्हाला व्हर्टिगो व संबंधित लक्षणांचा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यांनी सांगितलेले औषधोपचार घेणे महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास भविष्यात उद्भवू शकणाऱ्या गुंतागूंती टाळणे शक्य होते. नियमित तपासण्यांमध्ये सातत्य राखल्याने लक्षणांवर देखरेख ठेवायला मदत होते आणि त्यानुसार उपचारांच्या नियोजनात बदल करता येतात.
• योग्य उपचारांच्या साथीने व्हर्टिगोचे व्यवस्थापन करा: व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी, औषधे आणि काहींच्या बाबतीत शस्त्रक्रियेच्या मदतीने व्हर्टिगो नियंत्रणात आणता येतो. व्हर्टिगो कोच अॅपसारख्या उपाययोजना व्हर्टिगोच्या व्यवस्थापनावर सर्वंकष माहिती पुरवितात, ज्यामुळे लोकांना उपचारांच्या बाबतीत योग्य मार्गावर राहण्यास मदत होते व औषधे घेण्याची आठवण करणारी रिमाइंडर्स, लाइफस्टाइल टिप्स व रुग्णांच्या व्हेस्टिब्युलर यंत्रणेला (अवकाशात संतुलनाची व डोक्याच्या हालचाली संतुलन व हालचालीची जाणीव निर्माण करणारी संवेदी यंत्रणा) प्रशिक्षण देण्यास मदत करणासाठी खास डिझाइन केलेले व्यायामप्रकार यांसारख्या सेवांच्या मदतीने व्हर्टिगो हाताळता येतो.
• झोपेची इष्टतम स्थिती साधणे: आपले डोके उंचावलेल्या अवस्थेत ठेवून उताणे झोपल्याने व्हर्टिगोची लक्षणे कमी होण्यास मदत होते. कुशीवर झोपणे मात्र टाळा, कारण त्यामुळे व्हर्टिगोचा झटका येण्यास निमित्त मिळू शकते.
• सक्रिया रहा: योगासने, चालणे यांसारख्या हलक्या व्यायामामुळे तुम्ही अधिक चांगला तोल साधू शकता आणि व्हर्टिगोची लक्षणे कमी करू शकता.
शरीराचा तोल साधणे ही आपल्या दैनंदिन आयुष्याची एक मुलभूत बाजू आहे आणि व्हर्टिगो बॅलन्स अवेअरनेस आठवडा (१५–२१ सप्टेंबर) या स्थितीला अधिक समजून घेण्याचे, त्यावर उपाय शोधण्याची वेळेवर आठवण करून देण्याचे एक चांगले निमित्त आहे. जागरुकता वाढवून, लवकरात लवकर निदान करण्यास प्रोत्साहन देत आणि व्हर्टिगोचा त्रास सहन करणाऱ्यांना आधार देऊन आपण त्यांना संतुलन राखण्यासाठी व एक समाधानी आयुष्य जगण्यासाठी सक्षम बनवू शकतो.