मुंबई, १२ ऑगस्ट २०२४ – एक प्रसिद्ध नैसर्गिक हिरे कंपनी श्री.रामकृष्ण एक्सपोर्ट्स (SRK) ची परोपकारी शाखा असलेल्या श्री.रामकृष्ण नॉलेज फाउंडेशन (SRKKF) च्या वतीने जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेला संतोकबा मानवतावादी पुरस्कार समारंभ मोठ्या थाटात पार पडला.सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला, शिक्षण सुधारक व एचसीएल आणि शिव नाडर फाउंडेशनचे संस्थापक शिव नाडर, तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि सर्च फाउंडेशन संस्थापक, डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांचा यावेळी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, मुंबई येथे प्रथमच संतोकबा मानवतावादी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अयोध्येतील श्री. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त व महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान अध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत मा. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल आणि मा. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग हेही दुर्गम भागात ग्राउंड लेव्हलवर परवडणारी आरोग्य सेवा पुरविण्याच्या कार्याबद्दल प्रतिष्ठित संतोकबा पुरस्कार प्राप्त करण्यामध्ये होते. सर्च फाउंडेशनच्या स्थापनेद्वारे या दोघांनी होम-बेस्ड न्यूबॉर्न केअर (HBNC) इनिशिएटिव्ह, तसेच कम्युनिटी हेल्थ वर्कर (CHWs) इनिशिएटिव्हद्वारे आरोग्यसेवा नवकल्पनांचा परिचय करून, आदिवासी समुदायाच्या उत्थानासाठी अग्रणी भूमिका बजावली आहे. डॉ.अभय बंग म्हणाले,“माझ्या पत्नीला आणि मला या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज व श्री. गोविंद ढोलकिया यांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो. गडचिरोलीच्या जनतेच्या वतीने मी अत्यंत विनम्रतेने हा सन्मान स्वीकारत आहे, ज्यांच्या अतूट पाठिंब्याने आणि विश्वासाने मला या स्थानापर्यंत पोहोचविले आहे.”
श्री.गोविंद ढोलकिया, संस्थापक अध्यक्ष-राज्यसभा खासदार, श्री.रामकृष्ण एक्सपोर्ट्स, श्री.रामकृष्ण नॉलेज फाउंडेशन यांनी त्यांच्या आई, संतोकबा लालजीदादा ढोलकिया यांच्या निःस्वार्थ भावना आणि दृष्टी मूर्त रूप देणाऱ्या नि:स्वार्थीपणा, करुणा आणि सेवा या मानवतावादी मूल्यांना श्रद्धांजली म्हणून 2006 मध्ये संतोकबा मानवतावादी पुरस्कार सुरू केला होता. श्री गोविंद ढोलकिया म्हणाले,“संतोकबा पुरस्कार हा करुणेच्या शक्तीचा आणि जगावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या वचनबद्धता दाखला आहे. बदल घडवून आणण्यासाठी आणि इतरांनाही ते करण्यास प्रेरित करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो. हा सन्मान दयाळूपणातील ताकद आणि त्याचा समाजावर होणारा सखोल सकारात्मक प्रभाव अधोरेखित करतो.”
हे वर्ष एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण SRKKF देखील त्यांचा 10 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हा पुरस्कार यापूर्वी भारताच्या माननीय राष्ट्रपतींसारख्या प्रमुख व्यक्तींनी प्रदान केलेला आहे. यापूर्वी प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, अध्यात्मिक गुरू परमपूज्य दलाई लामा आणि अभियंता सोनम वांगचुक, भारताच्या श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन, अंतराळ शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी अध्यक्ष ए.एस. किरण कुमार आणि समाजसुधारक कैलाश सत्यार्थी यांना यापूर्वी या प्रतिष्ठित संतोकबा मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.