मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४: वंचित मुलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली एक प्रतिष्ठित, विना-नफा तत्त्वावर काम करणारी संस्था बेयरफूट एड्यु फाउंडेशनने द राईट पिच टूर्नामेंट २०२४ च्या सातव्या सीझनची यशस्वी सांगता करण्यात आल्याची घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईच्या फातिमा मैदानावर आयोजित या टूर्नामेंटमध्ये फाउंडेशनच्या क्रीडा प्रशिक्षण व जीवन कौशल्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या असामान्य क्रिकेट प्रतिभांचे दर्शन घडले. मालवणीची झील इंग्लिश हायस्कूल टीम द राईट पिच टूर्नामेंट २०२४ ची विजेता टीम ठरली. त्यांनी आपल्या असामान्य कामगिरीने या रोमहर्षक स्पर्धेत स्वतःचे एक अनोखे स्थान निर्माण केले आहे. या वर्षीच्या टूर्नामेंटमध्ये ९४ रोमहर्षक सामन्यांमध्ये तब्बल ४५ संघांनी भाग घेतला हा एक वेगळा विक्रम म्हणता येईल.
राईट पिच टूर्नामेंट हा एक वार्षिक उपक्रम आहे जो मुंबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्या मालवणी व गोवंडीतील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांवर व यशावर प्रकाश टाकतो. शारीरिक, भावनात्मक, सामाजिक आणि मानसिक कल्याणाला प्रोत्साहन देण्याचे व्यापक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, ही टूर्नामेंट युवा खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर आपली कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी मंच प्रदान करते.
माजी भारतीय क्रिकेटर आणि प्रसिद्ध कोच, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सॅटेलाईट अकॅडेमी प्रमुख श्री प्रदीप कासलीवाल सातव्या सीझनच्या सांगता समारोहाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खेळाच्या परिवर्तनकारी शक्तीबद्दल श्री कासलीवाल यांनी सांगितले, “वंचित समुदायांमधील युवा क्रिकेटर्सनी प्रदर्शित केलेली उल्लेखनीय कौशल्ये आणि तंत्रे पाहून मी खूपच प्रभावित झालो आहे. त्यांच्या प्रशिक्षकांनी या मुलांना मार्गदर्शन करून या टप्प्यावर आणून उत्कृष्ट काम केले आहे. मला त्यांच्या उज्वल भविष्याची खात्री आहे, व्यावसायिक क्रिकेटर बनण्याच्या अनेक संभावना मला त्यांच्यामध्ये दिसत आहेत. क्रिकेट विश्वाशी संबंधित व्यक्तीने द राईट पिच क्रिकेट फायनल्समध्ये प्रदर्शित केलेली कौशल्ये पाहणे खूपच प्रेरणादायी आहे.” त्यांच्या या शब्दांनी युवा खेळाडूंचा उत्साह वाढवला, खेळाप्रती आवड वाढवून प्रत्येक प्रयत्नामध्ये उत्कृष्टता आणण्याची प्रेरणा त्यांना दिली.
बेयरफूट एड्यु फाउंडेशनचे सह-संस्थापक श्री शुभंकर पॉल म्हणाले, “सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या टीच फॉर इंडिया क्लासरूममध्ये २०१५ साली राईट पिचचा जन्म झाला. गेल्या नऊ वर्षात आम्ही वंचित समुदायांमधील ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पुरवून एक सर्वांगीण संपन्न व्यक्ती बनवले. माझे विद्यार्थी आज कोच बनले आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि ते परिवर्तन घडवून आणत आहेत हे पाहून माझी छाती अभिमानाने भरून आली आहे.”