मुंबई, 5 सप्टेंबर 2024 -वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल गणेश मंडळ स्वयंसेवकांसाठी सीपीआर (कार्डिओपलमोनरी रीस्यूसीटेशन) प्रशिक्षण कार्यक्रम हा महत्त्वाचा नावीन्यपूर्ण उपक्रम सादर करत आहे. हा कार्यक्रम जागतिक हृदय दिनाच्या सन्मानाप्रीत्यर्थ सादर करण्यात येत असून – गणेशोत्सव आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यामध्ये आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद कौशल्य वाढवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या आणि गर्दीचे नियोजन करणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. या संभाव्य आव्हानांचा सामना करण्यासाठी वोकहार्ट हॉस्पिटल्सने विशेष अभ्यासक्रम विकसित केला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सीपीआर तंत्राची मूलभूत तत्वे, चेस्ट कंप्रेशन, रेस्क्यू ब्रिथ आणि ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटरचा (AEDs) वापर याचा समावेश असणार आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सत्रात स्वयंसेवकांना आत्मविश्वास वाटावा आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित हालचाल करण्यास सक्षम असल्याची खात्री पटण्यासाठी प्रात्यक्षिके आणि परिस्थिती – आधारित क्रियाकलापांचा समावेश असणार आहे. हा उपक्रम वोकहार्ट हॉस्पिटल्सच्या समाजाच्या आरोग्य आणि आणीबाणीच्या परिस्थितीतील तयारीसाठीच्या व्यापक बांधिलकीचा भाग आहे. कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवकांना इतरांचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याचे पूर्ण ज्ञान देऊन गणेशोत्सव आणि इतरही सार्वजनिक कार्यक्रमात अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे यामागचे ध्येय आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत सुरुवातीचे प्रशिक्षण खालील गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित केले जाईल :
लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गणेश गल्ली, मुंबई
तेजुकाया सार्वजनिक उत्सव मंडळ
चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळ
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
वोकहार्ट हॉस्पिटल्स हे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण इतरही अनेक ठिकाणीदेखील आयोजित करेल, यात फोर्टचा इच्छापूर्ती, फोर्ट; रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ गणेशोत्सव मंडळ; चिंच बंदर-डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळ यांचा समावेश आहे.
वोकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलचे केंद्र प्रमुख डॉ. वीरेंद्र चौहान म्हणाले की, “जागतिक हृदय दिनानिमित्त ‘रेज द ट्रेनर’ हा आमचा कार्यक्रम गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांना गंभीर जीवरक्षक कौशल्यांसह सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सदर प्रशिक्षण स्वयंसेवकांची आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची क्षमताच वाढवणार नाही तर समाजामध्ये सुरक्षितता आणि सज्जतेची संस्कृतीदेखील वाढवेल, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्वच गणेश मंडळाच्या स्वयंसेवकांना या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य व सुरक्षितत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करतो.”
सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम येत्या आठवड्यापासून सुरू होणार असून वोकहार्ट हॉस्पिटल्स गणेश मंडळांसोबत हे महत्त्वपूर्ण सहकार्या सुरू करण्यासाठी उत्सुक आहे.
कार्यक्रमाविषयी आणि या कार्यक्रमात कसे सहभागी व्हावे याबद्दल अधिक माहितीसाठी, वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.