मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४: बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स), पिलानीच्या वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम्स (डब्ल्यूआयएलपी) डिव्हिजनने नवे अभ्यासक्रम सुरु केल्याची घोषणा केली आहे. भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्राच्या दृष्टिकोनातून हे नवे अभ्यासक्रम डिझाईन करण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक व्हेइकल्स, स्मार्ट मोबिलिटी आणि ऑटोमोटिव्ह सायबरसिक्युरिटी सिस्टिम्स या ऑटोमोटिव्ह डोमेनच्या विशेष क्षेत्रांमध्ये इंजिनीयर्सना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने एका जागतिक कीर्तीच्या भारतीय संस्थेने तीन नवे पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी १८ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करता येतील.
बिट्स पिलानीमध्ये डब्ल्यूआयएलपीच्या कोर इंजिनीयरिंग ग्रुपचे प्रमुख प्रो.परमेस्व चिदंपरम यांनी सांगितले,”स्मार्ट मोबिलिटी ही एक परिवर्तनशील शक्ती आहे, याचे लाभ अनेक असून अनेक प्रगत तंत्रज्ञानांचा यामध्ये समावेश आहे. पण कौशल्यवृध्दीच्या दृष्टिकोनातून ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्राचा विशेष भर ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा आणि इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानांवर असला पाहिजे. या तीन नवीन पदव्युत्तर डिप्लोमा प्रोग्राम्समध्ये इंजिनीयर्सना संकल्पनांचे ज्ञान दिले जाण्याबरोबरीनेच रिमोट व व्हर्च्युअल लॅब्समार्फत प्रत्यक्ष जगातील परिस्थितीचा अनुभव घेण्याच्या संधी देखील मिळतील. इंजिनीयर्सना डिझायनिंग, मूल्यांकन आणि स्मार्ट मोबिलिटी सोल्युशन्सच्या अंमलबजावणीमध्ये सक्षम बनवणे हा प्रमुख उद्देश आहे. सध्याच्या वेगाने विकसित होत असलेल्या उद्योगक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हे खूप गरजेचे आहे.”
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम इन स्मार्ट मोबिलिटी- स्मार्ट मोबिलिटीमधील संकल्पना, तंत्रज्ञान आणि धोरणे यांची व्यापक समज विद्यार्थ्यांमध्ये विकसित करून नावीन्य, पर्यावरणपूरक प्रथा आणि शहरी वाहतुकीच्या क्षेत्रातील भविष्यातील लीडर्ससाठी डेटावर आधारित निर्णय प्रक्रियेला चालना देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. वेगाने बदलणाऱ्या स्थिती समजून घेऊन, संभाव्य धोके ओळखून आणि प्रभावीपणे प्रतिसाद देता येण्यासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी, प्रचंड मोठ्या सेन्सर डेटावर प्रक्रिया करण्याची क्षमता विद्यार्थी या अभ्यासक्रमातून मिळवू शकतात. यामध्ये लिडर, कॅमेरा, अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि रडार यांचा समावेश करण्यात आला आहे.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स- यामध्ये दोन सेमिस्टर आहेत. इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित, वृद्धीच्या भरपूर संभावना असलेली क्षेत्रे, उदाहरणार्थ, डिझाईन, वाहनांसाठी ऊर्जा व्यवस्थापन तंत्रे आणि ईव्ही रेग्युलेशन इत्यादींमध्ये करियर करू इच्छिणाऱ्या इंजिनीयर्ससाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थी मोटर कंट्रोल, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम्स आणि इलेक्ट्रिक वाहनांची हार्डवेयर-इन-द-लूप अंमलबजावणी याविषयी अधिक शिकू शकतील, त्यामुळे हा प्रोग्राम विद्यार्थ्यांना पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि एनर्जी स्टोरेज सिस्टिम्समधील सहायक तंत्रज्ञानाचे विश्लेषण करून त्याची अंमलबजावणी करण्यात मदत करेल, इतकेच नव्हे तर, उद्योगक्षेत्रातील मानकांनुसार भविष्यातील इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्यात देखील उपयुक्त ठरेल.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम इन ऑटोमोटिव्ह सायबरसिक्युरिटी- ऑटोमोबाईलचा जीवनकाल खूप मोठा असल्यामुळे हॅकर्सपासून असलेले धोके, सायबर सुरक्षेच्या नियमांच्या उल्लंघनाचे परिणाम, सायबर-फिजिकल यंत्रणेतील गुंतागुंत आणि रीयल-टाईम रिस्पॉन्ससाठीच्या आवश्यकता यामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्रात सायबर सुरक्षेच्या पारंपरिक पद्धती वापरणे पुरेसे ठरत नाही. ऑटोमोटिव्ह सायबरसुरक्षेतील आव्हाने दूर करण्यासाठी अनोखे ज्ञान आणि कौशल्ये आवश्यक असतात. सायबर सुरक्षा यंत्रणांच्या विविध पैलूंची एकंदरीत समज विकसित करण्यासाठी हा प्रोग्राम डिझाईन करण्यात आला आहे, त्यामध्ये थ्रेट मॉडेलिंग, रिस्क असेसमेंट, सिक्युरिटी कंट्रोल्स, फॉरेन्सिक, कम्प्लायन्स, ऑडिट्स आणि वाहन व यंत्रणेची सुरक्षा यांचा समावेश आहे.