मिळाला एक्सपल्स २०० ४व्ही आणि १० लाख रूपयांचा प्रायोजक करार
ओलेस्या डायस ठरली बेस्ट फिमेल ऑफ-रोड राइडर
विविध क्रीडा व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याप्रती आपली दृढ कटिबद्धता कायम राखत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्स व स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज देशभरातील राइडर्स व उत्साहींमध्ये चार महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या प्रखर स्पर्धेनंतर भारतातील ऑफ-रोड राइडिंग चॅम्पियनचा सन्मान केला.
जुलै २०२२ मध्ये सुरू झालेले हिरो डर्ट बाइकिंग चॅलेंज (एचडीबीसी) फायनल रेससह समाप्त झाले, जेथे देशभरातील टॉप-२० राइडर्सनी पहिला एचडीबीसी चॅम्पियन बनण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा केली.
फायनल रेसनंतर असाद खान चॅम्पियन ठरला. राकेश एन. अणि गिडयन हे अनुक्रमे प्रथम व द्वितीय उपविजेते ठरले.
विजेता, प्रथम उपविजेता व द्वितीय उपविजेता यांना अनुक्रमे लोकप्रिय हिरो एक्सपल्स २०० ४व्ही मोटरसायकल व १० लाख रूपये, ६ लाख रूपये व ४ लाख रूपयांचे प्रायोजक करार मिळाले.
ओलेस्या डायसला सर्व फेऱ्यांमधील तिच्या उत्तम कामगिरीसाठी देशातील बेस्ट फिमेल ऑफ-रोड राइडर म्हणून सन्मानित करण्यात आले.
एचडीबीसी एमटीव्ही आणि वूटवर प्रसारित होईल.
हिरो मोटोकॉर्पचे जयपूर येथील जागतिक दर्जाचे आरअॅण्डडी हब सेंटर ऑफ इनोव्हेशन अॅण्ड टेक्नोलॉजी (सीआयटी) येथे व आसपासच्या भागांमध्ये अंतिम आठवडा आयोजित करण्यात आला. संपूर्ण रेस व सहभाग अनुभव अव्वल आंतरराष्ट्रीय रॅली इव्हेण्ट्सनुसार डिझाइन करण्यात आले होते. हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅलीने संपूर्ण अंतिम आठवडा आयोजित केला होता.
मागील काही महिन्यांमध्ये १००,००० हून अधिक सहभागींनी एचडीबीसीसाठी नोंदणी केली आणि चार टप्प्यांमध्ये, ४१ शहरांमध्ये व १२० दिवस चाललेल्या प्रखर देशव्यापी स्पर्धेनंतर टॉप-२० ची निवड करण्यात आली.
एचडीबीसीबाबत बोलताना हिरो मोटोकॉर्पचे चीफ ग्रोथ ऑफिसर रणजीवजीत सिंग म्हणाले, “हिरो डर्ट बाइकिंग चॅलेंजमधील प्रचंड उत्साह व सहभागामधून ऑफ-रोड राइडिंग विभाग देशामध्ये वाढत असल्याचे दिसून येते आणि हिरो मोटोकॉर्प हिरो एक्सपल्स २०० ४व्ही सह या संस्कृतीला चालना देण्यामध्ये अग्रस्थानी राहिली आहे. एक्सपल्स व्यावसायिक, हौशी किंवा दैनंदिन वापरकर्ते अशा सर्व राइडर्सची आवडती बाइक आहे. एचडीबीसी देशातील अद्वितीय उपक्रम आहे, ज्याने राइडिंग उत्साहींसाठी यश संपादित करण्यासाठी संधींचे दरवाजे खुले केले आहेत आणि भारताला भावी चॅम्पियन्स दिले आहेत. आम्ही विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि भविष्यासाठी सर्व फायनालिस्टना शुभेच्छा देतो.’’
देशातील टॅलेण्टबाबत सांगताना हिरो मोटोकॉर्पचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर डॉ. अरूण जौरा म्हणाले, “हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅली जागतिक स्तरावर भारतीय ऑफ-रोड रेसिंगची ध्वजवाहक आहे आणि देशातील हौशी, तसेच व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करत आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान व नवोन्मेष्कारी वैशिष्ट्यांनी युक्त एक्सपल्स २०० ४व्ही राइडर्ससाठी स्पोर्टमध्ये सामील होण्यास, त्यांची आवड जोपासण्यास आणि मर्यादांपलीकडे जाण्यास उपयुक्त बाइक आहे. आम्हाला आमच्या प्रयत्नांना मिळत असलेले फळ पाहून आनंद होत आहे आणि विश्वास आहे की, हा स्पोर्ट येथे जलदपणे वाढेल. विजेत्यांचे अभिनंदन. हिरो मोटोस्पोर्ट्स भविष्यात राष्ट्रीय टॅलेण्टला पाठिंबा देत राहिल.’’
शहरी व प्रादेशिक फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ९० राइडर्स विभागीय फेरीमध्ये पोहोचले. हिरो मोटोस्पोर्ट्सच्या नॅशनल टीमने ४ दिवसीय विभागीय फेरीमध्ये सहभागींना प्रशिक्षित केल्यानंतर टॉप-२० डर्ट-बाइकिंग हिरोंनी फिनालेमध्ये प्रवेश केला.
अव्वल इंटनॅशनल टीम्सपैकी एक हिरो मोटोस्पोर्ट्स टीम रॅली हिरो मोटोकॉर्पची रॅली-रेसिंग टीम आणि डकार रॅलीमध्ये टप्पा जिंकलेली एकमेव भारतीय टीम आहे. टीममधील राइडर्स रॉस ब्रांच, जॅक्विम रॉड्रिग्ज, सेबेस्टियन बुहलर व फ्रान्सो कैमी यांनी रेसिडेन्शियल बूटकॅम्पमध्ये अव्वल सहभागींसह काम केले आणि त्यांना बहुमूल्य प्रशिक्षण दिले.
हिरो डर्ट बाइकिंग चॅलेंज हा ओईएमचा (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चुरर) अद्वितीय भारतभर टॅलेण्ट-हंट उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा ऑफ-रोड रेसिंगमध्ये आपली आवड जोपासण्याची, तसेच क्षेत्रात स्वत:चे नावलौकिक करण्याची इच्छा असलेल्या उदयोन्मुख राइडर्स, उत्साही व हौशी राइडर्सना अत्यावश्यक व्यासपीठ देण्याचा मनसुबा आहे.