मान्सून आला की सूर्याच्या उष्ण झळांपासून सुटका आणि हवाहवासा दिलासा मिळतो. गरमागरम चहाच्या सोबतीने भज्यांवर ताव मारण्याचा, लाँग ड्राइव्हवर जाण्याचा हा काळ. हा ऋतू आपल्यासोबत आनंद घेऊन येतो हे खरे असले तरीही याच काळात ट्रॅफिकमुळे होणारा उशीर, रस्तोरस्ती साचलेले पाणी आणि मोसमी आजारांसारखी अनेक आव्हानेही सामोरी येतात. पोट व आतड्याशी संबंधित आणि माध्यमांद्वारे संक्रमित होणाऱ्या सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांचे प्रमाण पावसाळ्यामध्ये वाढते. , , या काळामध्ये आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
नवी मुंबई येथील मोरलवार चाइल्ड केअर हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट पीडिअॅट्रिशियन डॉ. सदानंद शेट्ये म्हणाले, “पावसाळ्यामध्ये ताप, घसा बसणे, पोटात कळा येणे किंवा अशाच प्रकारची विविध लक्षणे किंवा इतर आरोग्यविषयक तक्रारी घेऊन आमच्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये सर्वसाधारणपणे ६० टक्के वाढ होते. या ऋतूमध्ये सर्वत्रच अशी आजारपणं दिसून येतात हे लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि वेळच्यावेळी निदान करून घेणे ही आपले स्वास्थ्य सक्रियपणे सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
अबॉट इंडियाचे मेडिकल अफेअर्स डिरेक्टर डॉ. जेजो करनकुमार पुढे सांगतात, “पावसाळा म्हणजे काही आरोग्य समस्यांमध्ये वाढ होण्याचा काळ असतो आणि म्हणूनच या आजारांचे धोके, खबरदारीचे उपाय आणि आपले स्वास्थ्य अधिक चांगल्या प्रकारे कसे जपावे याविषयीची माहिती लोकांना मिळावी यासाठी त्यांची मदत करणे आवश्यक ठरते. वेळच्यावेळी केलेले निदान आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचार व पथ्यपाण्याचे काटकोरपणे पालन केल्याने रोगप्रतिकाशक्ती वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही मान्सूनचा आनंद अनुभवताना निरोगीही राहू शकाल.”
या ऋतूमध्ये सर्वत्र आढळून येणाऱ्या पुढील ५ आरोग्यसमस्यांवर लक्ष ठेवा:
1. सर्दी आणि फ्लू: तापमानात अचानक झालेले बदल आणि हवामानामध्ये वाढलेला दमटपणा यांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते व त्यामुळे विषाणूजन्य संसर्ग सहजपणे फैलावू शकतात. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशांमध्ये या काळामध्ये फ्लू (किंवा इन्फ्लुएन्झा)ची प्रकरणे पुन्हा-पुन्हा वाढताना दिसतात. घसा बसणे, ताप, सांधे किंवा स्नायू दुखणे, डोकेदुखी, मळमळणे किंवा डायरिया अशा समस्यांचा या आजाराच्या लक्षणांमध्ये समावेश होतो. इतर आजारांमध्येही अशाच प्रकारची लक्षणे दिसू शकतात, मात्र साध्या सर्दीच्या तुलनेत फ्लूचा शरीरावर होणारा परिणाम अधिक गंभीर असतो आणि म्हणूनच या आजाराची लक्षणे लवकरात लवकर ओळखणे गरजेचे आहे.
2. फंगल इन्फेक्शन: ओल असलेल्या, दमट ठिकाणी फंगल अर्थात बुरशीजन्य संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असते. यामुळे अॅथलिट्स फूट, रिंगवर्म आणि यीस्ट इन्फेक्शन्स सारखे जंतूसंसर्ग होऊ शकतात. खाज येणे, त्वचा लाल होणे किंवा सूजणे ही या संसर्गाची सर्वसाधारणपणे आढळून येणारी लक्षणे आहेत.
3. पोटाच्या समस्या: दूषित पाणी आणि बाहेरचे अन्न खाल्ल्याने डायरिया आणि फूड पॉयझनिंगसारखे गॅस्ट्रोइंटेस्टिनल अर्थात पोट व आतड्याचे आजार होऊ शकतात. पोटात दुखणे, मुरडा मारणे, मळमळणे इत्यादी लक्षणे यात दिसून येतात.
4. मलेरिया आणि डेन्ग्यू: मान्सूनमध्ये साचलेल्या पाण्यामुळे माध्यमांवाटे संक्रमित होणाऱ्या आजारांच्या जीवजंतूंच्या पैदाशीला मोकळे रान मिळते. खरेतर जगभरातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ११ टक्के रुग्ण आणि डेन्ग्यूच्या रुग्णांपैकी ३४ टक्के रुग्ण एकट्या भारतात आढळतात. ताप, हुडहुडी भरणे आणि घाम येणे ही मलेरियाची प्रमुख लक्षणे आहेत. डेन्ग्यूमध्ये खूप ताप, गंभीर डोकेदुखी, डोळ्यांमागे दुखणे, स्नायू दुखणे आणि शरीरावर चट्टे येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
आपल्या आरोग्याचे हवामानापासून रक्षण करण्यासाठी आणि पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी मोसमी आजारांना दूर ठेवण्यासाठीच्या चार सूचना:
1. योग्य प्रकारे स्वच्छता राखा: आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपले घर निर्जंतुक करा, साचलेल्या पाण्याचा निचरा करा, पाणी वाहून जाण्याची यंत्रणा नीट कार्यरत असेल याची खबरदारी घ्या आणि डासांसाठीचे रिपेलन्ट वापरा. आपले हात, विशेषत: जेवणापूर्वी साबणाने नियमितपणे धुवा, आपली त्वचा कोरडी ठेवा, मोकळे हवेशीर कपडे घाला आणि आपली नखे कापून स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्या.
2. समतोल आहार घ्या: चांगले आरोग्य व प्रतिकारशक्तीसाठी शरीराला पुरेसे पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. कितीही मोह झाला तरीही रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळा व त्याऐवजी घरामध्ये शिजविलेले ताजे अन्न खा म्हणजे जंतूसंसर्गाचा धोका कमी होईल. शक्यतो उकळलेले आणि गाळलेले पाणी पिऊन शरीराची आर्द्रतेची पातळी टिकविणे महत्त्वाचे आहे. योग्य प्रकारची उदाहरणार्थ व्हीटॅमिन सी सारखी जीवनसत्वे रोगप्रतिकारशक्ती बळकट बनविण्यासाठी अत्यावश्यक व संसर्गापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाची असलेली जीवनसत्वे आहारात समाविष्ट करणे ही स्वास्थ्य जपण्याची गुरुकिल्ली आहे. , संत्री, लिंबू, कॉलिफ्लॉवर, ढोबळी मिरची, ब्रोकोली इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. काहीवेळा संसर्गामधून लवकर बरे होण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला व्हिटॅमिन सीच्या अतिरिक्त सप्लिमेन्ट्सही देऊ शकतात.
3. सक्रिय रहा: पावसामुळे तुमच्या दैनंदिन वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो, तरीही व्यायामातील सातत्य टिकवा आणि बाहेर जाण्याऐवजी घरच्याघरीच योगा किंवा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही आपले शरीर तंदुरुस्त राखू शकाल, आपले स्नायू आणि हाडे बळकट करू शकाल व अधिक चांगल्या दर्जाची झोप तुम्हाला मिळू शकेल जे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
4. प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना करा: इन्फ्लुएन्झासारख्या आजारांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी आणि समाजालाही संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. पावसाळा सुरू होण्याआधी फ्लूचे इंजेक्शन घेतल्याने अशा आजांपासून व त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतींपासून सुरक्षित राहण्यास मदत होईल. लसीकरणाविषयी आणि फ्लूचे अधिक चांगले व्यवस्थापन कसे करावे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
तेव्हा संपूर्ण माहितीनिशी सतर्क व सुसज्ज रहा म्हणजे मान्सूनचा पुरेपुर आनंद उपभोगताना तुम्ही निरोगीही राहू शकाल.