वाशिम : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे वाशिम जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सभापती सुरेश मापारी (Suresh Mapari) यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पदाचा दुरुपयोग केल्याचे सिद्ध झाल्याने अमरावती विभागीय आयुक्तांनी तसे आदेश दिले आहेत. ३ जुलै २०२१ झालेल्या निवडणुकीत उकळीपेन गटातून सुरेश मापारी निवडून आले होते मात्र, वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार दत्ता विठोबा गोटे यांनी त्यांच्या निवडीला आक्षेप घेत विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती, या तक्रारी नुसार सुरेश मापारी हे कंत्राटदार आहेत व त्यांनी जिल्हा परिषदेतून कोल्हापुरी बंधारा बांधण्याचे कंत्राट घेऊन देयक सादर केले. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १७ (१ आय) सह कलम ४० (१) नुसार कंत्राटदार व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही, या कायद्यांचे उल्लंघन झाले असल्याने विभागीय आयुक्तांनी मापारी यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरेश मापारी हे जिल्हा परिषद बांधकाम विभाग वाशिम येथे नोंदणीकृत वर्ग ४ अ चे कंत्राटदार असून निवडणूक वाढविताना त्यांनी प्रमाणपत्र परत करून ते रद्द करून घेणे आवश्यक होते मात्र त्यांनी तसे न करता निवडणूक लढविल्याने ते अपात्र घोषित झाले आहेत.
सुरेश मापारी यांनी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खासदार भावना गवळी यांच्यासोबत शिंदे गटात न जाता उद्धव ठाकरेंकडे जाणं पसंत केले होते. सध्या वाशिम जिल्ह्यातील ठाकरे गटाचा ते सर्वात मोठा चेहरा आहेत. मात्र त्याचे सदस्यत्व रद्द झाल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
यासंदर्भात याचिकाकर्ते दत्ता विठोबा गोटे यांनी प्रतिक्रिया देतांना सांगितले की, निवडणुकी वेळी माझ्या विरुद्ध अपप्रचार केला, आम्ही वंचितचा उमेदवार खरेदी केला आहे असे म्हणत गैरमार्गाने, पैश्याच्या जोरावर निवडणूक जिंकली, मात्र आता आम्हाला न्याय मिळाला आहे.
विषय सभापती पदाची संधी हुकणार
जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झाल्याने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांची उद्या होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विषय सभापती पदासाठी निवडणुकीत संधी हुकणार आहे. सभापती पदासाठी मापारी हे प्रमुख दावेदार होते, मात्र त्याचे सदस्यत्व रद्द झाल्याने दुहेरी झटका बसला आहे.
हेही वाचा : पेट्रोलच्या बाटल्या, दगड ;भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला झाल्यानं शिवसैनिक आक्रमक
मापारी यांनी किनखेडा येथील कोल्हापुरी बंधारा बांधण्यापोटी जिल्हा परिषदेकडे ७२,१०,१०१ रुपयाचे देयक जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सादर केले होते, विभागाने यात कपात करून ६२,२५,१५९ इतकी रक्कम अदा केली होती. याशिवाय निवडून आल्यानंतरही वाशिम जिल्हा परिषदे अंतर्गत येणार पार्डी आसरा ते बोरी रस्त्याचे कंत्राट घेऊन त्यापोटी, ३,५५,१४७ एवढी रक्कम मिळवली, याशिवय इतर अनेक कामाचे लाखोंचे कंत्राट आपल्या पदाचा दुरुपयोग करून मिळवत गैर व्यवहार केल्याचे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा : एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी पण शेवटी शरद पवारांनी कॅच पकडलाच…!