मुंबई – टेनिस प्रिमियर लीगच्या सहाव्या पर्वासाठी नव्या केंद्राची निवड केली आहे. भव्य स्वरुपात लीग पार पडण्यासाठी या वेळी मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची (सीसीआय) निवड करण्यात आली आहे. ही लीग ३ ते ८ डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे.
टेनिस प्रिमियर लीग २०२४मधील टप्प्यासाठी टेनिस विश्वातील काही प्रमुख खेळाडू भारतात खेळणार आहेत. यामध्ये फ्रान्सचा ह्युगो ह्यूस्टन (जागतिक क्रमवारी ६१), भारताचा सुमित नागल (जागतिक क्रमवारी ७४, भारतातील अव्वल मानांकित) या परुष, तर पोलंडची मॅग्डा लिनेट (जागतिक क्रमवारी ४१), अर्मेनियाची एलिना अवनेसियान (जागतिक क्रमांक ५२) या महिला खेळाडूंचा समावेश आहे.
टेनिस प्रिमियर लीगच्या पाच यशस्वी पर्वांननंतर आयपीएलप्रमाणे टीपीएलची देखिल चर्चा वाढली आहे. लीगमुळे २५ गुणांची पद्धती चाहत्यांना आकर्षित करत आहे.
टेनिस चाहत्यांचे लक्ष वेधून सर्व फ्रॅंचाईजी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याकरता ५ सामने खेळतील. प्रत्येक साम्नयात पुरुष, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी अशा लढतींचा समावेश असेल. प्रत्येक सामन्यात १०० गुण असतील. प्रत्येक श्रेणीचे मूल्य २५ असेल. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक संघ साळखी टप्प्यात एकूण ५०० गुणांसाठी खेळतील. गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
लीगमध्ये पीबीजी पुणे जग्वार्स, बंगाल विझार्डस, पंजाब पॅट्रियट्स, हैदराबाद स्ट्रायकर्स, गुजरात पॅंथर्स, मुंबई लिओन आर्मी, गतविजेते बंगळुरू एसजी पायपर्स या फ्रॅँचाईजी संघांचा समावेश आहे.
टीपीएलने केवळ लीगवर लक्ष केंद्रित न करता भारतातील गुणवत्ता शोधण्यासाठी देखिल साथ दिली आहे. गुजरात स्टेट टेनिस संघटना (जीएसटीए), दिल्ली लॉन टेनिस संघटना (डीएलटीए), महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्याशी टीपीएलने परस्पर सामंजस्याचा करार केला असून, त्यानुसार त्या राज्यात जिल्हा मानांकन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतातील विविध प्रदेशातून शंभरहून अधिक अकादमी टीपीएल अॅपशी संलग्न करण्यात आल्या आहेत. टीपीएल अॅप संपूर्ण भारतातील टेनिस समुदायाला जोडते. या अॅपवरून टेनिस खेळाडूंना त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी इतरांशी चर्चा करण्यासाठी मदत करते.
- टेनिस प्रिमियर लीगचे सह संस्थापक कुणाल ठाकूर म्हणाले, ‘मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे आणि टीपीएलच्या सहाव्या आवृत्तीच्या निमित्ताने अव्वल दर्जाचे टेनिसपटू मुंबईत खेळणार आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. सीसीआयमधील टेनिस कोर्ट इतिहासातील काही रोमांचक सामन्यांचे साक्षीदार राहिले आहे. या आठवणी या निमित्ताने टीपीएलला देखिल जवळ आणतील असा विश्वास वाटतो ‘ .
‘टेनिस हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ आहे आणि सीसीआयसारख्या प्रतिष्ठित ठिकाणाशी जोडले गेल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. आता एका विलक्षण हंगामाची आम्ही वाट पाहात आहोत’, असे लीगचे आणखी एक सह संस्थापक मृणाल जैन म्हणाले.€