मुंबई, ६ मार्च २०२५:- ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ हा एकाचवेळी २१ संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन घडवणारा सोहळा यंदा ८ व ९ मार्च रोजी मुंबईत होणार आहे. वरळीतील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ च्या डोम मध्ये हा भक्तीचा महाकुंभ होणार आहे. भारताला संपन्न आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव लाभले आहे. आपल्या संतांनी आणि सद्गुरूंनी या परंपरेचा जागर करत समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखवला. सुदृढ, आरोग्यदायी आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीची वाट आपल्याला दाखवली. अध्यात्मिक मार्गावर चालण्याचा निर्धार करतानाच गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ सोहळ्याचे आयोजन केले आहे. प्रवेश सगळ्यांसाठी मोफत आहे मात्र नावनोंदणी आवश्यक करणे अनिवार्य आहे.
अभिजित पवार, अध्यक्ष, एपी ग्लोबले यांनी सांगितले,‘‘या कार्यक्रमातून भाविकांना एकाचवेळी पवित्र पादुकांचे दर्शन घेण्याचा अपूर्व योग उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा कार्यक्रम प्रत्येकाला अमर्याद आध्यात्मिक शक्ती आणि एकत्रित भक्तीचे बळ देणारा आहे. सोबतच मा.ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाददादा पै उपस्थित राहणार आहेत. रविवारी ९ मार्च रोजी आध्यात्मिक मार्गदर्शक, वक्ते, लेखक, शिक्षणतज्ज्ञ व श्री एम सत्संग फाऊंडेशनचे प्रमुख पद्मभूषण श्री एम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे,’’
या एकमेवाद्वितीय आणि पवित्र सोहळ्यात ‘एपी ग्लोबले’ तर्फे आध्यात्मिक प्रगती आणि सांस्कृतिक समृद्धी साठीच्या ‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’ ची घोषणा होणार आहे. भाविकांना आध्यात्मिक आनंद आणि मनःशांती ची अनुभूती देणाऱ्या या अनोख्या सोहळ्याला गेल्या वर्षी उदंड प्रतिसाद लाभला होता. टाळ-मृदंगांचा गजर, अखंड हरिनामाचा जप, अभंगांचे सूर, दिंडी-रिंगणाने प्रसन्न झालेले वातावरण, यामुळे या भक्ती सोहळ्याने वेगळीच उंची गाठली होती. संत व श्रीगुरूंच्या पादुकांच्या दर्शनानंतर कृतार्थतेची आणि समाधानाची भावना प्रत्येक भाविकांच्या डोळ्यात दाटली होती. हाच अनुभव भाविकांना पुन्हा एकदा देण्यासाठी उत्सवाचे आयोजन केले आहे. उत्सवात भाविकांना संत आणि श्रीगुरूंच्या चरणांचे दर्शन घेण्याचा सुवर्णयोग प्राप्त होणार आहे. यासह उत्सवात आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन, भजन, कीर्तन, रिंगण सोहळा, नामस्मरण, ओंकार जप आदी कार्यक्रमही होणार आहेत.
संत व श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी- संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत नामदेव, संत जनाबाई, संत नरहरी सोनार, संत सेना महाराज, संत सावता माळी, संत एकनाथ, संत तुकाराम, संत निळोबाराय, श्री महेश्वरनाथ बाबाजी, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज (शेगाव), समर्थ रामदास स्वामी, टेंब्ये स्वामी महाराज, गोंदवलेकर महाराज, शंकर महाराज, गुळवणी महाराज, गजानन महाराज (शिवपुरी), श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असतील.