बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि वृक्ष प्राधिकरणाने आयोजित केलेला 28वा फुलोत्सव वीरमाता जिजामाता उद्यान, भायखळा, मुंबई येथे पार पडला. या तीन दिवसांच्या वार्षिक सोहळ्यात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी हजेरी लावली. या भव्य फुलांच्या प्रदर्शनात बॉलिवूड कलाकार आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांनी सहभाग घेतला.
प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, रणजीत, शहबाज खान, विजय पाटकर, नेहा जोशी, किशोरी शहाणे आणि अभिनेत्री-इन्फ्लुएंसर एकता जैन यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि फुलांच्या या अद्वितीय सौंदर्याचा आनंद घेतला. बीएमसीच्या उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सर्व सेलिब्रिटी आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले. या सोहळ्यात जपान, स्वीडन आणि मलेशिया या देशांच्या वाणिज्य दूतांनीही हजेरी लावली.
यंदाच्या फुलोत्सवाची संकल्पना ‘भारताचे राष्ट्रीय प्रतीक’ होती. या अंतर्गत डॉल्फिन, वाघ, मोर आणि इतर प्रतीकांची भव्य फुलांची सजावट साकारण्यात आली होती. 20,000 पेक्षा अधिक रोपांच्या कुंड्या, फुलझाडे, फळझाडे आणि विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन या प्रदर्शनात होते.
ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी जितेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. त्यांनी आपली नैसर्गिक प्रेमभावना व्यक्त करताना सांगितले की, ते आपल्या घराच्या गच्चीवर फुले आणि भाज्या लागवड करतात.
पर्यावरणपूरक कार्यासाठी ओळखले जाणारे जॅकी श्रॉफ यांनी या प्रदर्शनीचे कौतुक केले आणि मुंबईची हरियाळी टिकवण्यासाठी बीएमसीच्या प्रयत्नांचे स्वागत केले. झाडे लावण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी प्रदूषणविरहित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.
उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी लहान मुलांमध्ये झाडांप्रती प्रेम निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. यंदाच्या थीममध्ये भारताच्या राष्ट्रीय गौरवाला निसर्गाशी जोडण्यात आले होते. बाघ, मोर, भारतरत्न, अशोक चक्र यांसारख्या राष्ट्रीय चिन्हांची आकर्षक फुलांनी सजावट केली होती.
अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एकता जैन यांनी दरवर्षी वाढदिवसाला एक झाड लावण्याचा संकल्प जाहीर केला आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर झाडे लावण्याचे आवाहन केले.