मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३: देहात (DeHaat) हा शेतकऱ्यांना सर्वांगीण कृषी सेवा प्रदान करणारा भारतातील आघाडीचा ॲग्रीटेक प्लॅटफॉर्म भारतातून द्राक्षे व अन्य इतर फळांच्या निर्यात व्यवसायात वाढ करण्यासाठी फ्रेशट्रॉप फ्रुट्स लिमिटेड सोबत धोरणात्मक भागीदारीत प्रवेश करत आहे. या भागीदारीमुळे दोन्ही कंपन्यांच्या ध्येयधोरणात समन्वय साधला जाऊन शेतकऱ्यांच्या अधिकाधिक सहभागामुळे फळ व्यापाराची मूल्य साखळी बळकट होण्यास, तंत्रज्ञानाचे आदानप्रदान व पायाभूत सुविधा सुधारण्यास चालना मिळेल.
देहातचे संस्थापक व सीईओ म्हणतात, “फ्रेशट्रॉपने २०+ देशांमध्ये आपला बिझनेस विस्तारणाऱ्या ५०+ जागतिक रिटेल कंपन्यांसोबत ज्या पद्धतीने संबंध प्रस्थापित केले, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत फ्रेशट्रॉपने शेकडो शेतकऱ्यांना द्राक्ष निर्यातीस सुरवात करण्यास पाठबळ दिले. हि बाब “शेतकरी प्रथम” कंपनी असलेल्या देहातच्या धेय्याशी सुसंगत आहे. आम्ही १८ महिन्यांपूर्वी आमचा निर्यात व्यवसाय स्थापन केला आणि आज आम्ही भारतातून २० हुन अधिक प्रकारच्या कृषी मालाची निर्यात मध्य पूर्व, युके व युरोपमध्ये करत आहोत. आम्ही देहात व फ्रेशट्रॉपच्या मूलभूत क्षमतांमध्ये अत्यंत घट्ट समन्वय असल्याचे व त्या एकमेकांना पूरक असल्याचे पाहत आहोत. द्राक्ष व एकूणच कृषी निर्यात वाढीसाठी होत असलेल्या या भागीदारीबाबत आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. फ्रेशट्रॉपच्या संस्थापक सदस्यांसमवेत संपूर्ण टीम बिझनेसमध्ये पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहील, तर देहात आपल्या नेटवर्क व संसाधनांच्या साहाय्याने मार्केटचा विस्तार, द्राक्षाच्या नव्या वाणांचा विकास आणि जोडलेल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञान-आधारित सखोल काढणी-पूर्व सेवा या बाबींवर लक्ष केंद्रित करेल.”
फ्रेशट्रॉप फ्रूट्स लिमिटेडचे नेटवर्क आणि ग्रेडिंग, पॅकिंग व प्रीकुलिंग सेंटर्स ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत देहातने पुढील टप्पा गाठला आहे आणि कंपनी फ्रेशट्रॉपच्या वरिष्ठ नेतृत्वासह सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या संरचनेत सामावून घेणार आहे.
फ्रेशट्रॉप फ्रूट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अशोक मोतियानी म्हणतात, “व्यवसायाला पुढील स्तरावर नेण्यासाठी द्राक्षांचे नवीन वाण विकसित करणे, इतर जागतिक बाजारपेठांमध्ये आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रवेश करणे आणि वर्षभर उलाढाल करण्यासाठी उत्पादनांमध्ये वैविध्यता आणणे आवश्यक आहे. देहातचे सामर्थ्य दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा, तंत्रज्ञानाच्या आधारे पीक सल्ला आणि देशांतर्गत विक्री आणि वितरणाकरीता पायाभूत सुविधा, यांमध्ये आहे. “शेतकरी-प्रथम” हा दृष्टिकोन असलेल्या या दोन्ही कंपन्यांच्या सेवांमध्ये मूलभूत समन्वय आहे, ज्यात मूल्य साखळीतील प्रत्येक घटकाचा विचार केला जातो, अखंडता राखली जाते आणि नव्या सेवा व सुविधांच्या निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण बाबींमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे, आम्हाला असे वाटते की ही भागीदारी सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरेल, ज्यामध्ये शेतकऱ्यांना नवीन वाण मिळू शकतील व उत्पादनांमध्ये विविधता आणता येईल, ग्राहकांना दर्जेदार उत्पानांची श्रेणी मिळू शकेल, कंपनीच्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील आणि भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.”
या भागीदारीमुळे देहात दर्जेदार कृषी उत्पादने, कृषी सल्ला, वित्तपुरवठा, जागतिक बाजारपेठेसोबत संलग्नता अशा सर्वांगीण सेवा फ्रेशट्रॉपसोबत जोडलेल्या शेतकऱ्यांना प्रदान करू शकेल व त्यामुळे माहितीची अविरत देवाणघेवाण होऊन सेवांमध्ये सुधारणा होतील.