मुंबई, २० डिसेंबर २०२२: ईशान्येकडील राज्यांमध्ये काम करणारी सामाजिक संस्था ‘माय होम इंडिया’च्या वतीने दरवर्षी दिला जाणारा ‘वन इंडिया अवॉर्ड’ यावर्षी अरुणाचल प्रदेशचे जनजातीसाठी कार्य करणारे कार्यकर्ते ‘तेची गुबेन’ यांना दादर येथील स्वा. स्वावरकर सभागृह येथे प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे हे बारावे वर्ष आहे. यावेळी व्यासपीठावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू, भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे सीईओ आशिष चौहान, सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल उपस्थित होत्या.
अरुणाचल प्रदेशच्या सीमा चीन सोबत नाही तर तिबेट देशासोबत जोडलेल्या आहेत. चीन ने काहीही म्हटले तरी, हे वास्तव कोणीही बदलू शकत नाही, असे उद्गार अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, ‘तवांगमध्ये चीनने घुसखोरीचा आणखीन प्रयत्न करू नये व लक्षात ठेवावे की, हा भारत १९६२ चा भारत नसून मोदींचा आधुनिक भारत आहे.
तर भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यावेळी म्हणाले की, तेची गुबेन यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रचंड कार्य केले आहे. स्थानिक समाजाच्या उद्धारासाठी, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी गुबेन यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
तेची गुबेन यांनी पुरस्कार स्वीकारताना सर्व उपस्थित महाराष्ट्रीयन जनतेचे आणि मान्यवरांचे आभार मानले. तर मंदार खराडे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.