maharashtraprimenews
ठळक बातम्या
Trailer launchचित्रपटठळक बातम्यामनोरंजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगला ‘गोदावरी’चा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा*

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
येत्या ११ नोव्हेंबरला ‘गोदावरी’ हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

या पूर्वी ही या बहुचर्चित चित्रपटातील ‘कोजागिरी’ आणि ‘खळ खळ गोदा’ या श्रवणीय गाण्यांनी संगीत प्रेमींना भुरळ घातली होती. त्यात आता ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढवली आहे. ट्रेलरमध्ये जितेंद्र जोशी म्हणजेच निशिकांतचे नाशिकमध्ये राहणारे कुटुंब दिसत आहे. या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण दाखवण्यात आले आहे. ‘गोदावरी’ नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा आहे. गोदावरी नदी जिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे, तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात दिसतेय. नदीच तर आहे, असे मानणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे, ती ‘गोदावरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची.

या चित्रपटाविषयी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मराठी चित्रपटांचा आशय आणि दर्जा हा नेहमीच जागतिक दर्जाचा राहिला आहे. आणि याच मांदियाळीतला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आपल्या सर्वांकरता ही निश्चितच अभिमानाची गोष्ट अशी आहे की प्रदर्शनापूर्वीच ‘गोदावरी’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून अनेक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.
नदीशी आपलं नातं अत्यंत जुनं आहे. संस्कृती, परंपरा या सगळ्यांचा थेट संबंध नदीशी जोडलेला आहे. दुर्दैवानं मधल्या काळात आपण नदीचं महत्व विसरलो, त्यामुळे नद्याही प्रदूषित झाल्या आणि आपले विचार, संस्कारही प्रदूषित झालेत. ते बदलणं खूप गरजेचं आहे.
‘गोदावरी’ नदीभोवती एका व्यक्तीची कहाणी गुंफून आणि त्यातून मोठा आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे हे काम केलं आहे, ते अतिशय सुंदर आहे. यानिमित्तानं नदीशी असलेलं आपलं नातं पुनर्जीवित करता येईल.
हा असा विषय आहे ज्यात अंधश्रद्धा नसून केवळ श्रद्धा आहे. अशा प्रकारची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीपर्यंत पोहोचणं, हा मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो.
मी हा सिनेमा आवर्जून पाहाणार असून ‘गोदावरी’च्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा’’

चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ”राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर आता ‘गोदावरी’ आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. हा एक भावनिक आणि कौटुंबिक चित्रपट आहे, जो मनाच्या खोलवर जाणारा आहे. अनेकदा असं होत की, एखादी गोष्ट साध्य करण्याच्या नादात आपण अनेक जवळच्या गोष्टी, नाती मागे सोडतो आणि त्याच मौल्यवान नात्यांची किंमत जाणवून देणारा हा चित्रपट आहे. नात्यांचे महत्व अधोरेखित करणारा ‘गोदावरी’ संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे.”

‘गोदावरी’बद्दल जितेंद्र जोशी म्हणतात, ‘’गोदावरीच्या निमित्ताने मी एक नवी सुरूवात करतो आहे. कारण ‘गोदावरी’ हे निर्मिती क्षेत्रातील माझं पहिलं पाऊल असणार आहे. आणि आज महत्वाचं म्हणजे आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गोदावरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा हा चित्रपट आहे. आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे. आणि आता चित्रपट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा मला विशेष आनंद आहे. मला आशा आहे की प्रेक्षक या चित्रपटाला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील.”

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणी विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने India @ 75 या निमित्ताने भारतीय भाषांमधील ६ चित्रपटांची निवड ‘कान्स’ या जागतिक महोत्सवासाठी केली होती, त्यात ‘गोदावरी’ या एकमेव मराठी चित्रपट समावेश होता.

त्याचबरोबर इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय – इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात ‘गोदावरी’ने आपली मोहोर उमटवली आहे.

Related posts

जानेवारी 2024 मध्ये ओपन सिग्नल च्या अहवालानुसार एअरटेल मुंबईतील ब्रॉडबँड स्पीड लढाईत आघाडीवर*

Shivani Shetty

YRF ने त्यांच्या आगामी थिएटर रिलीज – द ग्रेट इंडियन फॅमिली मध्ये सिंगिंग सेंसेशन भजन कुमार म्हणून विक्की कौशल समोर आणले!*

Shivani Shetty

हावरे प्रॉपर्टीजचा बोरिवलीमध्ये अभिनव आणि परवडणारा’ प्रकल्प सुरू .

Shivani Shetty

Leave a Comment